
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध सामाजिक व राजकीय संस्थांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेस कमिटी, लायन्स क्लब आणि जैन सोशल ग्रुपतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करून महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन
गजानन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी, शहर अध्यक्ष पंकज पवार, अमीर शेख, सिकंदर डांगे, अशोकराव भोसले यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
लायन्स क्लब व जैन सोशल ग्रुपचा पुढाकार
लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. याच दिवशी लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा २८ वा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. दुसरीकडे, जैन सोशल ग्रुपतर्फे महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यसनमुक्ती कमिटीचे डॉ. सूर्यकांत दोशी, अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव निना कोठारी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी व इतर सदस्य उपस्थित होते.



