कामगार भवन बांधकाम कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे नियोजन करा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । पुणे । कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

साखर संकुल येथे आयोजित कामगार विभागाच्या पुणे विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक एम. आर. पाटील, अपर संचालक अ. धो. खोत उपस्थित होते.

कामगार भवनसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ते दोन एकर जागा निवडणे आवश्यक असून जागा निवडताना कामगारांची सोय पहावी. या इमारतीत जिल्हा कार्यालये व विभागीय कार्यालये अशी स्वतंत्र व्यवस्था असावी. शक्यतो एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भूमीपूजन या वर्षातच होईल असे नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करा असे डॉ. खाडे यावेळी म्हणाले.

कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. पुणे विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयांची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे, वैयक्तीक प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावा अशा सूचना दिल्या.

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, साखर कारखान्यातील कामगारांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. काही कारखाने बंद पडल्यामुळे कामगारांच्या देय रकमांबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील,

एमआयडीसी तसेच औद्योगिक क्षेत्राबाहेरीलही सर्व कंपन्या नोंदणीकृत असल्याबाबत खात्री करावी. नोंदणी न झालेल्या कारखान्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कामगारांच्या नोंदणीसाठी मोहीमस्तरावर काम करावे. एकही कामगार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. कामगार नोंदणीबाबतच्या अडचणीही यावेळी मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या.

ई-श्रम कार्ड नोंदणीला गती द्यावी

श्री. खाडे यांनी ई-श्रम कार्ड नोंदणीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ई-श्रम नोंदणी काळाजी गरज असून प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी कालबद्धरितीने पूर्ण करावी. नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे. यामध्ये केलेल्या कामाची नोंद अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात केली जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले.

धोकादायक कारखान्यांचे निरीक्षण वेळच्यावेळी पूर्ण करा

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचा आढावा घेताना डॉ. खाडे यांनी अतिधोकादायक कारखाने व धोकादायक कारखान्यांचे निरीक्षण वेळच्यावेळी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसचे कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवा अशाही सूचना दिल्या.

यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा, कामगारांची वैद्यकीय तपासणी, प्राणघातक अपघातांची माहिती, सानुग्रह अनुदान व नुकसान भरपाई आदींबाबत आढावा घेण्यात आला.

प्रधान सचिव श्रीमती सिंघल म्हणाल्या, कामगार कार्यालय आणि कामगार यांचा थेट संवाद असावा. मध्यस्थीला वाव देता कामा नये. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा. वीटभट्टी कामगार, शेतात काम करणारे कामगार यांची ई- श्रम कार्ड साठी नोंदणी करा. प्रलंबित वैयक्तिक प्रकरणे प्राथम्याने निकाली काढावीत असेही त्या म्हणाल्या.

अतिधोकादायक कारखाने, धोकादायक कारखाने, रासायनिक कारखाने आदी कारखाने असे एकूण १ हजार ५७६ कारखाने नोंदणीकृत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी पुण्याचे कामगार उप आयुक्त, उपसंचालक बाष्पके, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी येथील सहायक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!