
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण शहरात अभिषेक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने वारकऱ्यांना पाणी आणि लाडू वाटप.
स्थैर्य, फलटण, दि. 21 जुलै : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फलटण शहरात अभिषेक निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि लाडूचे मोफत वाटप केले. लाखो भाविकांना प्रवासात दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
वारीच्या निमित्ताने शहरात आलेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या बहुउद्देशीय सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक सेवेचा शेकडो वारकरी भाविकांनी अत्यंत समाधानाने लाभ घेतला.
नगराध्यक्षांचे मोलाचे सहकार्य
वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्याची इच्छा अभिषेक निंबाळकर यांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे व्यक्त केली होती. याला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आणि मोठ्या प्रमाणावर लाडू उपलब्ध करून दिले.
शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा बजावण्यात आली. वारीच्या काळात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिषेक निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.