फलटण: सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा – राजीनाम्याची मागणी

लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटणमध्ये धरणे आंदोलन. यावेळी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. 21 जुलै : लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या नवी दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील वाढत्या गैरप्रकारांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

शिक्षण व्यवस्थेतील विकृतीवर टीका

पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील समस्या नसून शिक्षण व्यवस्थेला लागलेली गंभीर विकृती असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. शिक्षणातील पारदर्शकता आणि गुणवत्तेवर या प्रकारांचा विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. वाढते खाजगीकरण आणि शिक्षणातील असमानतेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांना अधिक संधी मिळत असून गरीब विद्यार्थी मागे पडत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.

राजीनाम्याची मागणी आणि सहभाग

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात कालिदास चोरमले, निवृत्ती खताळ, नानासो गोवेकर, वैभवराज नरुटे, नितीन सुळ, गणेश कुंभार, विकास नाळे, सागर गावडे, मंगेश आवळे, कैलास रणदिवे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

Back to top button
Don`t copy text!