दैनिक स्थैर्य | दि. 12 मार्च 2024 | फलटण | आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते फलटण ते बारामती या रेल्वे प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे. फलटण ते बारामती रेल्वेसाठी माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नेहमी प्रयत्न केलेले होते अगदी ते आजारी होते. तेव्हा सुद्धा फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पासाठी दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा करत होते. आज भूमिपूजन होत आहे हे त्यांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती आहे; असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण रेल्वे स्थानकावर फलटण ते बारामती या रेल्वे प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आयोजित केला होता. फलटण ते बारामती या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन स्वरूपात संपन्न झाले. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, यांच्यासह विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची ऑनलाइन स्वरूपात उपस्थिती होती.
खासदार रणजितसिंहचे डोळे पाणवले …..
फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी बघितले होते. त्यांचे स्वप्न सुमारे 28 वर्षांनी सत्यात आलेले आहे. स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर हे खासदार असताना त्यांनी फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पाबाबत आवाज उठवला होता. अगदी त्यांच्या आजारपणाच्या काळात सुद्धा त्यांनी फलटण ते बारामती रेल्वेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे हे सांगत असताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे डोळे पाणावले.