
फलटणमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान ‘संडे SHGs मार्ट’ भरविण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना या उपक्रमातून थेट बाजारपेठ मिळणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त फलटण नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ जनआजीविका योजना आणि आत्मनिर्भर शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संडे SHGs मार्ट’ या विशेष आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान सलग तीन दिवस फलटण नगरपरिषद प्रांगणात हा बाजार भरणार असून, महिला बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि विविध घरगुती उत्पादने येथे उपलब्ध होणार आहेत.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ
‘संडे SHGs मार्ट’मध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले सेंद्रिय, स्वच्छ आणि घरगुती चवीचे खाद्यपदार्थ तसेच विविध घरगुती उत्पादने एकाच ठिकाणी होलसेल दरात उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमातून बचत गटांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ मिळण्यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न आहे.
गणेशोत्सवानिमित्त तीन दिवस विशेष बाजार भरविल्यानंतर ‘संडे SHGs मार्ट’ दर रविवारी फलटण नगरपरिषद प्रांगणात नियमितपणे भरविण्यात येणार आहे. फलटणकरांनी कुटुंबासह बाजाराला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.
उपक्रमाची यशोगाथा केंद्र शासनाकडे जाणार
नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे राज्य अभियान व्यवस्थापक प्रसादराजे भोसले यांनी फलटण नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘संडे SHGs मार्ट’ उपक्रमाची प्रशंसा केली आहे. महिला बचत गटांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारमूल्य मिळवून देणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची यशोगाथा केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची यशोगाथा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेच्या या उपक्रमाला राज्य स्तरानंतर राष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.