
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या फलटण केंद्राने श्रीराम मंदिरात मारुती स्तोत्र व रामरक्षा पठण केले. पुढील कार्यक्रमात विष्णू सहस्रनाम व गीता पठण होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०४ सप्टेंबर : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकच्या फलटण केंद्राच्या वतीने श्रीराम मंदिर येथे २९ ऑगस्ट रोजी मारुती स्तोत्र आणि रामरक्षा पठण करण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमानंतर ५ सप्टेंबर रोजी विष्णू सहस्रनाम आणि गीतेच्या १५ व्या अध्यायाच्या पठणाचेही आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांकडून सामूहिक स्तोत्र पठण
पुष्पा कदम, नातू, वृंदा सहस्त्रबुद्धे, स्नेहल तगारे, नियोजिता केंजळे आणि रेवती गोसावी यांनी उपस्थित भाविकांकडून स्वरबद्ध पद्धतीने मारुती स्तोत्र व रामरक्षा पठण करून घेतले. त्यानंतर रामनाम जप करण्यात आला. सुभाष देशपांडे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी फलटण केंद्राच्या कार्यकारिणीतील निखिल केसकर, विभूते, विष्णुप्रद, सचिन कुलकर्णी, अतुल पेंढारकर, किरण गोगटे, नितीन लटकर, श्रुती इनामदार, जयंत सहस्त्रबुद्धे, मुकुंदराव जोशी, अमेय चिटणीस, मंगेश पेटकर आणि डॉ. श्रीपाद चिटणीस यांनी नियोजन केले. नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचेही सहकार्य लाभले.
५ सप्टेंबरला विष्णू सहस्रनाम अन् गीता पठण
५ सप्टेंबर रोजी सरत्या श्रावणी शनिवार आणि गोपालकाल्यानिमित्त मारुती स्तोत्र व रामरक्षा पठणासह विष्णू सहस्रनाम आणि गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण केले जाणार आहे. विष्णू सहस्रनाम पठणावेळी श्रींच्या मूर्तीला सहस्र तुळशी अर्पण केल्या जाणार असून, त्यानंतर आरती व गोपालकाल्याचा प्रसाद वाटप होईल.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, फलटणमधील बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन फलटण केंद्रप्रमुख चंद्रशेखर दाणी यांनी केले आहे.