
साताऱ्यात आरोग्य व शिक्षण क्षेत्रासाठी ३२४ कोटींचा निधी मंजूर झाला असून ४५ आरोग्य केंद्रे आणि २०९ शाळांचा चेहरामोहरा बदलणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे आणि जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करण्यासाठी ३२४ कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण आणि विकास
जिल्ह्यातील एकूण ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यासाठी ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी २० केंद्रांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण शाळांना आधुनिक सुविधा
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २०९ आदर्श मराठी शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांसाठी २१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.