
लग्नसमारंभ आणि सार्वजनिक महाप्रसादाच्या जेवणासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली असून ७ दिवस आधी माहिती देणे अनिवार्य केले आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ सप्टेंबर : लग्नसमारंभ, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी किंवा महाप्रसादाच्या कार्यक्रमांमधील अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नवी नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक जेवणाचा कार्यक्रम आयोजित केल्यास त्याची माहिती ७ दिवस आधी एफडीएच्या अधिकाऱ्यांना द्यावी लागणार असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
केटरर्सना द्यावी लागणार खरेदीची माहिती
नवी नियमावली लग्नसमारंभातील जेवणासाठीही लागू असणार आहे. मात्र वधू-वर किंवा त्यांच्या पालकांना कोणतीही परवानगी घेण्याची गरज नसून जेवण तयार करणाऱ्या केटरर्सकडून ही प्रक्रिया केली जाईल. केटरर्सना वापरासाठीचा कच्चा माल कुठून खरेदी केला आहे, याची माहिती प्रशासनाला द्यावी लागेल. तसेच दूध, खवा, पनीर, तूप, मिठाई, सुकामेवा, बर्फ, पाणी आणि खाद्यरंग यांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले जाईल.
सर्व धर्मीयांच्या सणांसाठी समान नियम
या नियमांचा उद्देश कार्यक्रमांवर बंधने आणणे नसून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे हाच असल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले. सण-उत्सवांच्या काळात अन्नाची मागणी वाढत असल्याने एफडीएने विशेष अन्न सुरक्षा कृती आराखडा लागू केला आहे. ईद, होळी, बकरी ईदपासून गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपर्यंतच्या सर्व सणांमध्ये अन्नपदार्थांची तपासणी केली जाईल. हे नियम सर्व धर्मीयांच्या सणांसाठी समान पद्धतीने लागू राहतील.