उपवर्गीकरणाला विरोध; फलटणमध्ये अनुसूचित जातींचा संविधान समर्थन मोर्चा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी फलटणमध्ये १० सप्टेंबर रोजी संविधान समर्थन मोर्चा काढून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी संविधान समर्थन मोर्चा समितीच्या वतीने गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता फलटणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार पेठेतील समाज मंदिरापासून बारामती चौकमार्गे प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

५९ जातींतील समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन

अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाची विभागणी होऊन विविध घटक जातींचे नुकसान होईल, अशी भूमिका संविधान समर्थन मोर्चा समितीने मांडली आहे.

शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांतील गुणवंत उमेदवार आणि पुढील पिढीवर उपवर्गीकरणाचा परिणाम होण्याची भीतीही आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे समाजात याबाबत जागृती करून महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध समाजघटकांचा मोर्चाला पाठिंबा

मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन येथे विविध समाजघटकांच्या प्रमुखांची बैठक झाली. यामध्ये बौद्ध, चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार तसेच वाल्मिकी मेहतर रुखी समाजाच्या प्रतिनिधींनी उपवर्गीकरणविरोधी मोर्चात सहभागी होण्याची भूमिका मांडल्याचे आयोजकांनी सांगितले.

संविधान समर्थन मोर्चा समितीने आयोजित केलेला हा मोर्चा मंगळवार पेठ समाज मंदिरापासून सुरू होऊन बारामती चौकमार्गे फलटण प्रांत कार्यालयावर जाणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!