
थेट WhatsApp वर मिळवा
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे दीपावलीनिमित्त प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ नोव्हेंबर : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे पर्यावरणपूरक दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणमुक्त दिवाळी शपथ व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उपक्रमांची माहिती
दीपावली निमित्त श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी सचिन सूर्यवंशी (बेडके) यांना विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या पणत्या व आकाशकंदील भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यालयांना प्रशालेच्या वतीने भेटवस्तू देऊन दीपावलीच्या सदिच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रशालेचे उपप्राचार्य पी. डी. घनवट यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये प्रशालेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मातीचे किल्ले बनविणे, पाककला व रांगोळी स्पर्धांची माहिती दिली. तसेच या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्राचार्यांचे मार्गदर्शन व आरोग्याची काळजी
प्रशालेच्या प्राचार्या एन. एम. गायकवाड यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करण्याचे आवाहन केले. दिवाळी उत्सव साजरा करीत असताना पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य द्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. हा सण एकमेकांविषयी आदर, प्रेम, आपुलकी व काळजी घेणारा असून तो सर्वांनी गुण्यागोविंदाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान प्रा. एस. डी. यादव यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले.





