
फलटण पंचायत समितीत आयोजित पालखी सोहळा नियोजन बैठकीला प्रसारमाध्यमांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०१ जुलै : आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी फलटण पंचायत समितीमध्ये आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकीपासून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. या प्रकारामुळे पत्रकार आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या बैठकीला आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. याशिवाय सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, गटविकास अधिकारी अक्षय गव्हाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक हजर होते.
प्रसारमाध्यमांची ‘एलर्जी’ कोणाला?
पालखी सोहळा हा लाखो वारकरी आणि भाविकांशी संबंधित सार्वजनिक कार्यक्रम आहे. वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आणि पाणीपुरवठा यांसारख्या विषयांवरील महत्त्वाचे निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमे पार पाडत असतात. मात्र, या बैठकीचे वार्तांकन करण्याची संधी पत्रकारांना नाकारण्यात आल्याने प्रशासनाच्या धोरणावर गंभीर टीका होत आहे.
सार्वजनिक हिताच्या बैठकीत माध्यमांना दूर ठेवण्यामागे नेमके कारण काय, याचे उत्तर प्रशासनाने देणे अपेक्षित आहे. माध्यमांना प्रवेश न देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांचा होता की फलटण येथील कुणाचा?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.
