
फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत रामराजे उद्यानाचे नाव बदलून संत सगुणामाता उद्यान करण्याच्या प्रस्तावावर चर्चा. सभेत अतिक्रमणावरून अधिकाऱ्यांना थेट इशारा, तर अनिकेतराजे नाईक निंबाळकरांच्या मौनाने वेधले लक्ष.
स्थैर्य, फलटण, दि. ३० जून : फलटण नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सगुणामाता नगर येथील ‘रामराजे उद्याना’चे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ करण्याच्या प्रस्तावावर मोठी चर्चा झाली. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीसह एकूण २१ विषयांना मंजुरी देण्यात आली.
उद्यानाच्या नामकरणावरून मतमतांतरे
सगुणामाता नगर येथील साई मंदिरासमोरील उद्यानास सध्या ‘रामराजे उद्यान’ असे नाव आहे. या उद्यानाला ‘संत सगुणामाता उद्यान’ असे नाव देण्याचा प्रस्ताव अशोक जाधव यांनी दिला होता. त्याचे सूचक म्हणून सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी प्रस्तावाचे वाचन करत सूचना मांडली तर याला किरण राऊत यांनी अनुमोदन दिले. यावेळी पांडुरंग गुंजवटे यांनी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र, खाजगी संस्थांना त्यांचे नाव दिले असल्याने सरकारी उद्यानाला संत सगुणामाता यांचे नाव देण्यास विरोध नसावा, अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडली.
अधिकाऱ्यांना कारवाईचा थेट इशारा
शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा पंकज पवार यांनी उपस्थित केला. यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. पुढील सभेपूर्वी अतिक्रमण न काढल्यास थेट घरी बसण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच शहरातील मोकळ्या भूखंडांच्या स्वच्छतेवरून विकास काकडे, सचिन अहिवळे आणि पांडुरंग गुंजवटे यांच्यात खडाजंगी झाली. संबंधित भूखंड मालकांना नोटीस पाठवून स्वच्छता न केल्यास नगरपरिषद स्वतः स्वच्छता करून त्याचा खर्च करात समाविष्ट करेल, असा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागासाठी जेसीबी भाड्याने घेण्यावरूनही जोरदार वाद झाला.
श्रीमंत अनिकेतराजेंचे मौन
या सभेत विरोधी गटातील स्वीकृत नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर पूर्णपणे शांत दिसले. मागील सभांमध्ये आक्रमक भूमिका घेणारे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी एकाही विषयात सहभाग घेतला नाही. गटनेते पांडुरंग गुंजवटे उपस्थित असताना त्यांच्या या मौनामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
सभेतील इतर मंजूर विषय
या सभेत आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरात दर्शन बारी, हिरकणी कक्ष आणि स्वच्छतेसह १९ कामांना मंजुरी देण्यात आली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्याच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली.
अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान निवारा शेड व कुरेशी नगरमधील विकासकामे मंजूर करण्यात आली. शहरातील २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मार्गी लागली. उन्हाळ्यातील पाणीटंचाई पाहता जुने हातपंप दुरुस्त करणे, नवीन बोअरवेल घेणे आणि गोळीबार मैदान येथे पाच लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यास संमती देण्यात आली. काळूबाई नगर येथील टाकी तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेशही देण्यात आले.
