फलटण: नाना पाटील चौकातील कोंडी फुटणार; नगराध्यक्ष समशेरदादांचे आदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणमधील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगराध्यक्षांनी पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुतळा एका बाजूला घेण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ जानेवारी : फलटण शहरातील अत्यंत गजबजलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले आहेत. यावेळी पुतळा स्थलांतराचा प्रस्तावही समोर आला आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या सूचना आणि पाहणी

शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्येची दखल घेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी कोंडी फोडण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसह चौकाची पाहणी केली.

पुतळा एका बाजूला घेण्याचा प्रस्ताव

यावेळी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. चौकाच्या मध्यभागी असणारा क्रांतीसिंह नाना पाटील यांचा पुतळा त्याच चौकात एका बाजूला घेतल्यास रस्ता रुंद होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकते, अशी सूचना बांधकाम विभागाने केली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी कठोर निर्णय

या प्रस्तावावर आणि एकूण परिस्थितीवर भाष्य करताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. “सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी आवश्यक असेल ती कार्यवाही करा. पुतळा स्थलांतराबाबत तांत्रिक बाबी तपासून आणि जनभावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्या,” असे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे लवकरच या चौकाचा श्वास मोकळा होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!