रणजितदादांच्या ‘राजभवन’वर गणरायाचे उत्साहात आगमन, घातले फलटणच्या विकासाचे साकडे! नगराध्यक्ष समशेरसिंहांकडून ‘इको-फ्रेंडली’ बाप्पाची प्रतिष्ठापना

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या ‘राजभवन’सह नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. १४ सप्टेंबर : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘राजभवन’ या निवासस्थानी लाडक्या गणरायाचे अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले आहे. बाप्पाची विधीवत प्रतिष्ठापना करताना, फलटण तालुक्याच्या सर्वांगीण आणि अखंडित विकासासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्री विघ्नहर्त्या गणरायाकडे विशेष साकडे घातले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही गणरायाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.

दुसरीकडे, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानीही श्री गणरायाचे मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावात स्वागत करण्यात आले. समाजाला एक आदर्श संदेश देत नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी यंदा ‘इको-फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

पर्यावरण रक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि गोमातेचे महत्त्व जपत, केवळ देशी गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून बनवलेल्या उदबत्ती, धूप आणि दिव्याचाच वापर पूजेसाठी करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी यंदाच्या वर्षीपासून घेतला आहे. या मंगलमय प्रसंगी सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाप्पाची मनोभावे विधीवत पूजा करत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Back to top button
Don`t copy text!