फलटण नगरपालिकेच्या निर्णयामागे नेमकं कारण काय? माजी नगरसेवक अनुप शहा आक्रमक

फलटण नगरपरिषदेच्या ठराव क्र. २५ ची अंमलबजावणी न झाल्याने माजी नगरसेवक अनुप शहा यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा इशारा दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेच्या २५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक २५ व ठराव क्रमांक २५ ची प्रशासनाकडून अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. नगरपरिषदेच्या सभागृहाने मंजूर केलेल्या ठरावाला तब्बल सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने माजी नगरसेवक अनुप शहा यांनी आता सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

ठेकेदाराचा लाभ अन् नात्याचे हितसंबंध?

संबंधित ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांशी असलेल्या कथित संबंधांमुळेच ठरावाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रखडविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केला आहे. ठरावाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, यात कोणाचा वैयक्तिक अथवा आर्थिक हितसंबंध गुंतला आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

माहिती अधिकार अन् स्मरणपत्राला केराची टोपली

ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी २६ जून रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांना स्मरणपत्र देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. विशेष म्हणजे या प्रकरणाची पारदर्शकता समोर यावी म्हणून माहिती अधिकारात माहिती मागवली असता, तीही जाणीवपूर्वक देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अखेर नाईलाजास्तव सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी करण्यात येणार आहे.

Back to top button
Don`t copy text!