
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण नगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शनधारकांना मुदतीत कनेक्शन नियमित करण्याचा सक्त इशारा दिला आहे. तसेच, शहरातील सार्वजनिक नळ कायमचे बंद केले जाणार आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शनधारकांनी आपले कनेक्शन मुदतीत स्वतःहून नियमित करून घ्यावे, अन्यथा कनेक्शन कायमचे खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी दिला आहे. या कारवाईसोबतच शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शनही कायमचे बंद करण्याचा मोठा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुदतीत नोंदणी केल्यास दंडात्मक कारवाई टळणार
ज्या नागरिकांनी अनधिकृत कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी स्वतःहून नगरपालिकेत नोंदणी केल्यास कोणताही दंड न आकारता ते नियमित करून दिले जाणार आहेत. मात्र, दिलेल्या मुदतीनंतर बेकायदेशीर कनेक्शन आढळल्यास ते कायमचे बंद करून संबंधितांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे राहुल निंबाळकर यांनी स्पष्ट केले. शहरात वेळेत आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी अनधिकृत कनेक्शन शोधण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सार्वजनिक नळ बंद; ‘ग्रुप कनेक्शन’चा पर्याय उपलब्ध
बेकायदेशीर नळ कनेक्शनवरील कारवाईसोबतच शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन कायमचे बंद केले जाणार आहेत. जे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सार्वजनिक नळांवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी पर्याय म्हणून दोन ते पाच नागरिकांच्या गटासाठी ‘ग्रुप नळ कनेक्शन’ उपलब्ध करून दिले जाणार आहे. बेकायदेशीर कनेक्शनमुळे पाण्याचा दाब कमी होऊन अधिकृत ग्राहकांना फटका बसतो, त्यामुळे सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा देण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे सभापती निंबाळकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.





