फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा; आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अंकिता गांधी व भक्ती नाळेला सुवर्णपदक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथील ‘द स्टार डान्स स्टुडिओ’च्या अंकिता गांधी आणि भक्ती नाळे यांनी अंदमान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सुवर्णपदक व पुरस्कार पटकावला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १७ नोव्हेंबर : अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे (ABSS) अंदमान-निकोबार येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत फलटण येथील ‘द स्टार डान्स स्टुडिओ’च्या संस्थापिका अंकिता गांधी आणि त्यांची विद्यार्थिनी भक्ती नाळे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. दोघींनीही ‘ओपन एथनिक’ (Open Ethnic) या नृत्यप्रकारात सुवर्णपदकासह ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ पटकावत फलटणच्या नावलौकिकात मोठी भर घातली आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दुहेरी यश

नितीन गांधी व संगीता गांधी यांची कन्या अंकिता गांधी आणि प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. किरणकुमार नाळे व डॉ. राजश्री नाळे यांची १५ वर्षीय कन्या भक्ती नाळे यांनी हे लक्षवेधी यश मिळवले आहे. मे २०२६ मध्ये पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आणि त्यानंतर नोव्हेंबर २०२६ मध्ये अंदमान-निकोबार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघींनी आपले कौशल्य सिद्ध केले. या दोन्ही स्पर्धांमधील विजयी नृत्याचे दिग्दर्शन स्वतः अंकिता गांधी यांनी केले होते. गुरु आणि शिष्या यांनी एकाच मंचावर एकत्रितपणे सुवर्णपदक मिळवल्याने शहरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

अंकिता गांधींचा प्रेरणादायी नृत्यप्रवास

‘द स्टार डान्स स्टुडिओ’च्या संस्थापिका असलेल्या अंकिता गांधी यांना नृत्यक्षेत्रातील १३ वर्षांहून अधिक अनुभव असून, आजवर त्यांनी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे. युनेस्कोचा (UNESCO) अधिकृत सल्लागार दर्जा असलेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघामार्फत कलाकारांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या अत्यंत मानाच्या जागतिक व्यासपीठावर फलटणच्या दोन गुणवंत कन्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!