
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील दुष्काळ लक्षात घेऊन फलटण नगरपरिषदेने पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑक्टोबर : महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर केला असून, भविष्यातील पाणीटंचाईची परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेने केले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कडक पावले उचलली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पाणी बचतीसाठी पालिकेच्या कडक सूचना
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी पालिकेने सहा महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. नळ कनेक्शनला तोट्या (कॉक) बसवून घेणे आणि पाणी भरून झाल्यावर त्या बंद करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी शौचालय, गटारी किंवा रस्त्यावर सोडून त्याची नासाडी करू नये. नळाला विद्युत मोटार लावल्याचे आढळल्यास ती जप्त करून नळधारकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, पाणी साठवण टाक्यांवर फ्लोटिंग व्हॉल्व्ह बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा.
कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्यास कारवाई
पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना जादा पाणी सोडण्यासाठी आग्रह किंवा दमदाटी करू नये; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालिकेने दिला आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने किंवा कपडे धुण्यासाठी आणि जनावरे धुण्यासाठी करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
उपाययोजनांची सविस्तर माहिती
या संपूर्ण उपाययोजनांबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.





