फलटण शहरात राडारोडा टाकल्यास दंडात्मक कारवाई व परवाना रद्द करण्याचा इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण नगर परिषदेने सार्वजनिक जागांवर राडारोडा टाकणाऱ्यांना ७ दिवसांत तो उचलण्याची मुदत देत दंडात्मक कारवाई व परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 26 नोव्हेंबर : फलटण नगर परिषद हद्दीतील नागरिक, बांधकामधारक, घरमालक, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार व विकासक यांना शहरात सुरू असलेल्या बांधकाम व पाडकामातून निर्माण होणारा राडारोडा (विटा, दगड, माती, सिमेंट, काँक्रीट इत्यादी) सार्वजनिक रस्ते, पदपथ, नाले, गटारे व सार्वजनिक जागांवर न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या नगररचना विभागाच्या जा. क्र. फनप /नगररचना विभाग/३५२५/२०२६ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

वाहतूक व स्वच्छतेला बाधा

सार्वजनिक जागांवर टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, शहराच्या स्वच्छतेस बाधा येत आहे. तसेच नाले व गटारे तुंबून पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

व्यवस्थापनाची जबाबदारी व ७ दिवसांची मुदत

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील लागू तरतुदी तसेच केंद्र शासनाचे एन्व्हिरॉनमेंट कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट मॅनेजमेंट रूल्स, २०२५ अन्वये बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी संबंधित राडारोडा निर्माण करणाऱ्या व्यक्ती, बांधकामधारक व ठेकेदार यांची आहे. ज्या नागरिकांनी अथवा बांधकामधारकांनी सार्वजनिक रस्ते, पदपथ, नाले, गटारे किंवा सार्वजनिक जागांवर बांधकामाचा राडारोडा टाकलेला आहे, त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत स्वतःच्या खर्चाने तो उचलून घ्यावा.

नियमांचे पालन आणि कारवाईचा इशारा

यापुढे कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक रस्ते, पदपथ, नाले, गटारे अथवा सार्वजनिक जागांवर बांधकामाचा राडारोडा टाकू नये, तसेच बांधकाम व पाडकामातून निर्माण होणारा राडारोडा नियमानुसार संकलित करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी. दिलेल्या मुदतीत राडारोडा उचलून न घेतल्यास नगर परिषदेमार्फत तो हटवण्याची कारवाई करण्यात येईल, त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करून दंडात्मक कारवाई केली जाईल आणि बांधकाम परवानगी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!