
फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील स्वच्छतेवरून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. कामकाजात सुधारणा न झाल्यास विभाग प्रमुखांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. तसेच आरटीओ कार्यालय स्थलांतरासह विविध विकासकामांवर चर्चा झाली.
स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : फलटण शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी आरोग्य विभागाच्या कारभारावर जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली. खुद्द नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील स्वच्छतेसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करत आरोग्य विभागाला धारेवर धरले. आरोग्य विभागाचे सभापती सचिन अहिवळे यांनीही विभागप्रमुख राठोड यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी गटाचे पांडुरंग गुंजवटे यांच्यासह विविध नगरसेवकांनीही आरोग्य विभागासंदर्भातील तक्रारींचा पाढा वाचला. अखेर कामकाजात सुधारणा न झाल्यास आरोग्य विभाग प्रमुखपदाचा पदभार तातडीने काढून घेण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा दि. १८ ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले व मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेपुढे बांधकाम, पाणीपुरवठा, वसुली विभागासह विविध विभागांचे एकूण १३ विषय ठेवण्यात आले होते.
सभेला सत्ताधारी खासदार गटाचे रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, राहुल निंबाळकर, मोहिनी हेंद्रे, सुपर्णा अहिवळे, मीना काकडे, सोमाशेठ जाधव, संदीप चोरमले, अशोकराव जाधव, मंगलादेवी नाईक निंबाळकर, सुदाम मांढरे, किरण राऊत, कांचन व्हटकर व रूपाली सस्ते; तर विरोधी राजे गटाचे पांडुरंग गुंजवटे, स्मिता शहा, कविता मदने, पंकज पवार, विकास काकडे, विशाल तेली व श्वेता किशोर तारळकर उपस्थित होते. विरोधी गटाचे नेते श्रीमंत अनिकेतराजे अनुपस्थित होते. नगरपरिषदेच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख व प्रमुख अधिकारीही सभेला उपस्थित होते.
स्वच्छतेवरून आरोग्य विभागाची झाडाझडती
शहरातील स्वच्छतेच्या सद्यस्थितीचा मुद्दा सभेत चांगलाच गाजला. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत विविध प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर आरोग्य विभागाचे सभापती सचिन अहिवळे यांनीही विभागप्रमुख राठोड यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
पांडुरंग गुंजवटे यांनी, “जर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांचेच ऐकले जात नसेल, तर इतर सदस्यांचे कसे ऐकले जाणार?” असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर विविध सदस्यांनी आरोग्य विभागाबाबत असलेल्या तक्रारी सभागृहासमोर मांडल्या. यावर संबंधित विभागप्रमुखाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत कामकाजात सुधारणा न झाल्यास त्यांच्याकडील आरोग्य विभाग प्रमुखपदाचा पदभार तातडीने काढून घेण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
आयत्या वेळच्या विषयात नगरपरिषदेचे कर्मचारी जमदाडे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले नसल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. अनेकदा सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही ते गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा विषय नगराध्यक्षांनी मांडला आणि सभागृहाने त्याला मान्यता दिली. याच अनुषंगाने सर्व विभागप्रमुख व प्रमुख कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण तसेच अन्य सभांना वेळेत उपस्थित राहावे, अशी सूचना नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केली.
हरीबुवा मंदिर ते खंडोबा मंदिर संरक्षक भिंतीचे सुधारित अंदाजपत्रक
विषय क्र. १ मध्ये हरीबुवा मंदिर ते खंडोबा मंदिरपर्यंत नदीपात्रात आरसीसी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामातील तांत्रिक बदल व सुधारित अंदाजपत्रकाचा विषय मंजूर करण्यात आला. या कामासाठी पूर्वीचे अंदाजपत्रक २०२३ मध्ये तयार करण्यात आले होते. मात्र २०२५ मधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे प्रत्यक्ष जागेच्या भौगोलिक आणि तांत्रिक परिस्थितीत बदल झाल्याने भिंतीची लांबी, उंची, पाया आणि संरक्षणात्मक उपायांचा पुनर्विचार करून मंजूर निधीच्या मर्यादेत सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचा प्रस्ताव होता.
जुन्या इमारतीचे नूतनीकरण
विषय क्र. २ मध्ये बारस्कर गल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यामागील नगरपरिषद मालकीच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. पूर्वी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वापरात असलेली ही इमारत सध्या मोकळी आहे. इमारतीचा गैरवापर टाळणे आणि भविष्यात तिचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी अंदाजपत्रक तयार करून पुढील निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव सभेपुढे होता.
सुधारित जलकेंद्रातील दुरुस्तीची कामे मार्गी
विषय क्र. ३ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुधारित जलकेंद्रातील विविध दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. फिल्टरेशन प्लॅन्टमधील फिल्टरची दुरुस्ती व इपॉक्सी पेंट, फेरीफॅक्युलेटर व फ्लॅश मिक्सर मशिनरीची दुरुस्ती, लोखंडी जिना, विद्युत वायरिंग, दरवाजे, खिडक्या व लोखंडी जाळ्यांची दुरुस्ती अथवा नवीन बसविणे तसेच जॅकवेल, फिल्टरेशन प्लॅन्ट व पंप हाऊसचे रंगकाम यांचा यात समावेश आहे.
प्रत्येक प्रभागात महिला-पुरुषांसाठी प्रत्येकी दोन मुताऱ्या प्रस्तावित
विषय क्र. ४ मध्ये शहरातील विविध ठिकाणी पुरुष व महिलांसाठी सार्वजनिक मुताऱ्या उभारण्याच्या प्रस्तावावर पंकज पवार व पांडुरंग गुंजवटे यांनी नेमक्या जागा कोणत्या निश्चित करण्यात आल्या आहेत, असा सवाल केला. यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये महिलांसाठी दोन व पुरुषांसाठी दोन अशा मुताऱ्या प्रस्तावित असल्याची माहिती दिली. शहरात शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, न्यायालय, आरटीओ कार्यालय आणि मोठी बाजारपेठ असल्याने बाहेरगावाहूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. विशेषतः महिलांच्या सोयीच्या दृष्टीने मुख्य ठिकाणी सार्वजनिक सुविधा आवश्यक असल्याची बाब मूळ प्रस्तावात नमूद करण्यात आली होती.
तीन महापुरुषांच्या पुतळा समित्यांना मुदतवाढ
विषय क्र. ५ मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा व जयंती उत्सव समितीला पुतळा उभारणीचे काम करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
विषय क्र. ६ मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या पुतळा समितीलाही दि. ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.
विषय क्र. ७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व जयंती उत्सव समितीलाही पुतळा उभारणीसाठी दि. ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
शहरात ‘स्मार्ट वॉशरूम’ उभारण्याचा मार्ग मोकळा
विषय क्र. ८ मध्ये फलटण शहरातील विविध ठिकाणी पुरुष व महिलांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त ‘स्मार्ट वॉशरूम’ उभारण्याच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. प्रथम जागा निश्चित करून त्यांचे मालकी हक्क व विकास आराखड्याशी सुसंगतता तपासली जाणार आहे. त्यानंतर अनुभवी संस्था किंवा व्यक्तींकडून दरपत्रके, तांत्रिक मान्यता व आवश्यक मंजुऱ्या घेऊन जाहीर निविदा पद्धतीने काम करण्याचे प्रस्तावित आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशनची जुनी इमारत आरटीओला
विषय क्र. ९ मध्ये सध्या शिंगणापूर रोडवरील नगरपरिषद मालकीच्या जुन्या मुलींच्या वसतिगृहात सुरू असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शुक्रवार पेठेतील पूर्वी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वापरात असलेल्या नगरपरिषदेच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा विषय चर्चेला आला. सध्याच्या आरटीओ इमारतीच्या मागील बाजूस तडे, एका बाजूने खचलेला भाग आणि ढासळलेले कंपाऊंड असल्याची माहिती टिपणीत नमूद आहे.
पांडुरंग गुंजवटे यांनी सध्याची आरटीओ इमारत धोकादायक असल्याचे विषयातून स्पष्ट होत असल्याने कार्यालय तातडीने अन्यत्र हलवून ही इमारत पूर्णतः बंद करण्याची मागणी केली. त्यावर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी इमारत धोकादायक असली तरी ‘अतिधोकादायक’ नसल्याचे स्पष्ट केले. पूर्वी ग्रामीण पोलीस स्टेशन असलेल्या इमारतीची आवश्यक दुरुस्ती करून आरटीओ कार्यालय लवकरात लवकर तेथे स्थलांतरित केले जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले. नवीन जागा आरटीओला २ वर्षे ११ महिन्यांसाठी तात्पुरत्या भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव टिपणीत आहे.
तीन खोल्या नगरपरिषदेच्या रुग्णालयासाठी
विषय क्र. १० मध्ये शुक्रवार पेठ, बारस्कर गल्ली येथील नगरपरिषद शाळा क्र. ४ च्या इमारतीच्या पूर्वेकडील नवीन बांधकामातील तीन खोल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. या ठिकाणी अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरचे कामकाज सुरू करण्याचे नियोजन आहे.
याच चर्चेत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या काळात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त खोल्यांचे बांधकाम नियमित करून त्या नगरपरिषदेच्या रुग्णालयासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना पांडुरंग गुंजवटे यांनी केली.
भुयारी गटाराचा एकमेव विषय तहकूब
विषय क्र. ११ मधील बहुचर्चित भुयारी गटार योजनेचा विषय मात्र सभेने तहकूब ठेवला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत असलेल्या या योजनेबाबत नगरपरिषदेच्या पूर्वीच्या धोरणात्मक निर्णय आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून आलेल्या निर्देशांमध्ये विसंगती निर्माण झाल्याचे टिपणीत स्पष्ट होते. संचालनालयाने SPS उपांगाची जागा नगरपालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे सुमारे ९० टक्के काम झाल्यानंतर उर्वरित १० टक्के काम होऊ शकत नसल्याचे नमूद करून ठेकेदाराचे अंतिम देयक, ‘फोरक्लोजर’ प्रस्ताव, चौकशी आणि जीएसटी फरकाबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले होते.
दरम्यान, नगरपरिषदेने यापूर्वी योजनेचे अंतिमीकरण न करता प्रलंबित कामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे या विषयावर तातडीचा अंतिम निर्णय न घेता तो तहकूब ठेवण्यात आला. सभेतील १३ विषयांपैकी भुयारी गटाराचा विषय वगळता उर्वरित सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
प्रभागातील नेमके रस्ते कोणते? विरोधकांचा सवाल
विषय क्र. १२ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नगरपरिषदेकडे मागण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या ना-हरकत प्रमाणपत्रांवर चर्चा झाली. यामध्ये प्रमिलाताई चव्हाण हायस्कूलसमोरील मैदानात प्रेक्षक गॅलरी, इनडोअर स्पोर्ट्स हॉल व कंपाऊंड वॉल, रविवार पेठेतील नगरपालिका वाचनालयावरील जागेत हॉल, प्रभाग क्र. १ ते १२ मधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते-गटार-पिण्याच्या पाईपलाईन व परिसर विकास तसेच प्रभाग क्र. १३ मधील छत्रपती संभाजीराजे नगर येथे सामाजिक सभामंडप अशा कामांचा समावेश आहे.
प्रभागांची नावे टाकून मंजुरी घेतली जात असली तरी त्या-त्या प्रभागातील नेमके कोणते रस्ते प्रस्तावात धरले आहेत, याचा खुलासा सभागृहाला करावा, अशी मागणी पांडुरंग गुंजवटे यांनी केली. यावर प्रत्येक प्रभागात रस्त्यांची कामे केली जाणार असून विकासकामांना अडथळा न आणता संबंधित नगरसेवकांशी विचारविनिमय करून त्यांच्या प्रभागातील रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.
याच चर्चेदरम्यान गुंजवटे बोलत असताना अशोकराव जाधव यांनी हस्तक्षेप केल्याने काही काळ शाब्दिक चकमक झाली. “आम्हाला अध्यक्षांकडून उत्तर हवे आहे; आम्ही बोलत असताना इतरांनी बोलू नये,” अशी भूमिका गुंजवटे यांनी घेतली. त्यावर जाधव यांनीही आक्रमक होत आपणदेखील अध्यक्षांशीच बोलत असल्याचे स्पष्ट केले.
विविध प्रभागात क्षेत्रीय कार्यालयाचा प्रस्ताव
विषय क्र. १३ मध्ये प्रभाग क्र. २, ३, ९; ५, ६, ७ आणि ४, ८, १२ या प्रभागांसाठी विभागीय अर्थात क्षेत्रीय कार्यालये निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अशी कार्यालये सुरू झाल्यास नागरिकांची कामे जलद गतीने होण्यास मदत होईल, असे प्रस्तावात नमूद आहे. जागा निश्चित झाल्यानंतर नगररचना विभागाचा अभिप्राय घेऊन शासनाच्या विविध योजना किंवा नगरपरिषद निधीतून कार्यालये उभारण्याचे धोरण प्रस्तावित करण्यात आले आहे.
मलठण येथील अंगणवाडीची जागा भाडेपट्ट्याने दिल्याचा मुद्दा पांडुरंग गुंजवटे यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित भाडेपट्टा संपुष्टात आला असून त्या ठिकाणी नगरपरिषदेचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. या निर्णयाचे गुंजवटे यांनी स्वागत करत हा प्रस्ताव कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसह शहर विकासाच्या प्रश्नांवर भर
सर्वसाधारण सभेत स्वच्छता व आरोग्य विभागाचा कारभार हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्मार्ट वॉशरूम, पाणीपुरवठा केंद्राची दुरुस्ती, आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, प्रभागनिहाय रस्ते व विकासकामे, क्षेत्रीय कार्यालये आणि महापुरुषांच्या पुतळा समित्यांना मुदतवाढ अशा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. भुयारी गटार योजनेचा विषय मात्र पुढील निर्णयासाठी तहकूब ठेवण्यात आला.