
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे राबवल्या जाणाऱ्या नारीशक्ती अभियानांतर्गत फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वयंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन.
स्थैर्य, फलटण, दि. ०३ सप्टेंबर : सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘नारीशक्ती : महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित’ या विशेष अभियानांतर्गत फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वयंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि प्रसंगी प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.
कराड आणि साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. भारतातील पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर शैला टीके कुलकर्णी व त्यांच्या टीमने कराडमधील SGM कॉलेज, महिला महाविद्यालय तसेच साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि मल्टीपर्पज हॉल येथे हजारो विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाचे प्रत्यक्ष धडे दिले.
फलटण व वाई येथे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण
या उपक्रमांतर्गत वाई येथील कन्या शाळा आणि फलटण येथील मुधोजी हायस्कूल येथे विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शैला टीके कुलकर्णी व त्यांची टीम विद्यार्थिनींना प्रसंगावधान राखणे, मानसिक ताकद वाढवणे आणि संकटाच्या वेळी स्वतःचा बचाव करण्याच्या विविध तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाचा अधिकाधिक विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.