
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण फेस्टिव्हल २०२६ च्या उद्घाटनाप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा देण्याची ग्वाही दिली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑक्टोबर : शहराला कायमस्वरूपी पायाभूत सुविधा देऊन समृद्ध सांस्कृतिक वारसा उभा करण्याचे काम निश्चितपणे करू, अशी ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. श्री सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सांस्कृतिक वारसा गडद करण्याचा उपक्रम
शहराचा सांस्कृतिक वारसा लुप्त होत असताना तो पुन्हा गडद करण्याचे काम दिलीपसिंह भोसले यांनी या फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू केले आहे. पूर्वीच्या राजकारणामुळे सार्वजनिक जागांवरील आरक्षणे उठवून तिथे काँक्रीटची जंगले उभी राहिली असली तरी, आता शहरासाठी नवीन सांस्कृतिक भवन मंजूर झाले आहे. नगराध्यक्ष आणि त्यांची टीम मूलभूत सुविधांसाठी अतिशय चांगले काम करत असल्याचे नाईक निंबाळकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमात त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
हक्काचे व्यासपीठ आणि सांस्कृतिक पर्वणी
दुष्काळाचे सावट असले तरी सणासुदीच्या काळात व्यापारी वर्ग आणि महिलांच्या गृहउद्योगांना हक्काचे व्यासपीठ व आर्थिक चालना मिळावी, हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी नमूद केले. फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी नागरिकांना या चार दिवसीय महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे विभागीय केंद्र फलटणला सुरू करण्यासाठी रणजितसिंह यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी व्यक्त केली.





