
नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली असून वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ३० जुलै : फलटण तालुक्याला पिण्याचे व शेतीचे पाणी पुरवणाऱ्या नीरा आणि कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरूच असल्याने जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वीर धरण ९८.२१ टक्के भरले असून नीरा नदी पात्रासह कालव्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नीरा खोऱ्यातील धरणांची स्थिती
वीर धरणात ९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून नीरा नदीपात्रात ४,५८२ क्युसेक, डाव्या कालव्यात ८२७ क्युसेक आणि उजव्या कालव्यात १,५५० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
इतर धरणांमध्ये भाटघर धरणात २०.८३ टीएमसी म्हणजेच ८८.६३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. नीरा देवघर धरणात ११.२२ टीएमसी (९५.७० टक्के) पाणीसाठा झाला असून तेथून पॉवर हाऊसद्वारे ७५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरण ८७.२० टक्के भरले असून ३.२२ टीएमसी साठा उपलब्ध आहे.
धोम बलकवडी धरणात ८६ टक्के साठा
कृष्णा खोऱ्यातील फलटणच्या दुष्काळी भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या धोम बलकवडी धरणात ३.४३ टीएमसी म्हणजेच ८६.५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात २४ तासांत २२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जललक्ष्मी बोगद्याद्वारे ३३० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
पाणलोट क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरू असल्याने धरणांतील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि कालवा परिसरातील नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.