
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण-दहिवडी रोडवरील डिव्हायडरमुळे व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी कोळकीतील व्यापाऱ्यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांकडे केली आहे.
स्थैर्य, कोळकी, दि. १५ ऑक्टोबर : फलटण-दहिवडी रोडवर सुरू असलेल्या डिव्हायडरच्या कामामुळे ग्राहकांच्या ये-जा करण्यावर अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या डिव्हायडरचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी कोळकी येथील सर्व व्यापारी वर्गाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
व्यवसायावरील परिणाम टाळण्याची विनंती
कोळकी येथील व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ महामारी आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसायात अगोदरच मोठी मंदी आली आहे. त्यामुळे या नवीन डिव्हायडरच्या कामामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर किंवा ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचण्यास कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. व्यापाऱ्यांचा डिव्हायडरला विरोध नाही, मात्र व्यवसायिकांना सुलभ होईल अशा पद्धतीने त्याचे नियोजन होणे आवश्यक आहे.
५० फूट मागे घेण्याचा पर्याय
डिव्हायडर सध्याच्या नियोजनाप्रमाणेच ठेवावा किंवा आवश्यक असल्यास तो अंदाजे ५० फूट मागे घेऊन सर्वांना सोयीस्कर ठरेल अशी रचना करावी, असा पर्याय व्यापाऱ्यांनी सुचवला आहे. याबाबत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देऊन व्यापाऱ्यांची अडचण दूर करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. हे निवेदन स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात देण्यात आले.





