
फलटण शहरातील रस्त्यांची दुरवस्था व खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन काँग्रेसने पालिकेकडे ६ प्रमुख रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असून, आगामी गौरी-गणपती उत्सवापूर्वी शहरातील ६ प्रमुख रस्ते तातडीने नव्याने तयार करावेत, अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
६ प्रमुख रस्त्यांची दुरवस्था व नागरिकांचे हाल
शहरातील रस्त्यांवर मोठे खड्डे आणि चर पडल्याने वाहन चालवणे अत्यंत धोकादायक बनले आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आगामी गौरी-गणपती उत्सवात गणपती आगमन व विसर्जन मिरवणुका याच रस्त्यांवरून निघणार असल्याने भगवान महावीर स्तंभ ते नेहरू पुतळा (बारस्कर गल्ली), शंकर मार्केट ते शुक्रवार तालीम, निर्मलादेवी शाळा ते उपळेकर मंदिर, ॲड. भोईटे घर ते ॲड. यादव घर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाचबत्ती चौक आणि उमाजी नाईक चौक ते रथखाना हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांनी केली आहे.
पाईपलाईन गळती रोखण्याची मागणी
पालखी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना गिरवी नाका चौक ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान आणि पृथ्वी चौकाजवळ रस्त्याखालील पाईपलाईन लिकेज असतानाही त्यावर काम केले जात आहे. यामुळे रस्त्यावर पाणी येत असून संबंधित कंत्राटदाराला सूचना देऊन ही गळती आधी पूर्ण करावी आणि नंतरच काँक्रीटीकरण करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
