दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२४ | फलटण |
फलटण शहरात अनेक दुचाकी वाहनांवरून तीन किंवा जास्त व्यक्ती प्रवास करीत असल्याचे, वाहनांचे नंबर प्लेट नसल्याचे किंवा ती व्यवस्थित दिसत नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. फलटण शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेता, अनेक गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर झाल्याचे निदर्शनास येते. सन २०२४ मध्ये आजपर्यंत एकूण ६ दुचाकी वाहने चोरीस गेल्याबाबत फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यासाठी तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, जीवितहानी वाचविण्यासाठी संभाव्य अपघात टाळण्यासाठी, दुचाकीवरून नियमबाह्य रीतीने गाडी चालवणार्यांविरुध्द कारवाई करण्यासाठी १७ मार्च २०२४ रोजी फलटण शहरातील बारामती पूल येथे सायंकाळी आणि दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी सातारा पूल येथे नाकाबंदीचे आयोजन केले होते. या नाकाबंदीवेळी ४० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही गुन्हे प्रतिबंधासाठी फलटण शहर पोलिसांतर्फे नाकाबंदी करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, वाहनांच्या कागदपत्रांची खात्री करावी, विनापरवाना वाहन चालवू नये, वाहनांची नंबर प्लेट असावी आणि ती सुस्पष्ट असावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.