दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२४ | फलटण |
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून गुरुवार, ६ जुलै २०२३ पासून ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर राबविण्यात येत आहे.
पोलीस दल व जनता यांच्यामध्ये सौहादपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, तक्रारदारांच्या तक्रारींची योग्य व कायदेशीर दखल घेता यावी, तक्रारदारांना त्यांच्या तक्रारींचे निरसन न झाल्याने विनाकारण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार घेऊन जाऊ लागू नये तसेच पोलीस विभागाशी संबंधित सर्व समस्या तात्काळ सोडविता याव्यात, तसेच सैनिक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या तक्रारींचे निरसन प्राधान्याने करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांच्या ठिकाणी (सातारा, कोरेगाव, वाई, कराड, फलटण, पाटण, वडूज) दर १५ दिवसांनी म्हणजेत महिन्यातील पहिल्या व तिसर्या गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांनी आपल्या पोलीस विभागाशी संबंधित काही तक्रारी असल्यास ‘संवाद तक्रारदारांशी’ या उपक्रमात दि. २१ मार्च २०२४ रोजी आपल्या हद्दीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे १० ते १ या वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.