दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२४ | फलटण |
‘ज्याला जायचे, त्याला जाऊ द्या! जे राहतील ते खरे आपले म्हणायचे. फाटून घाबरून जाणार्याला आता राजे गटात जागा नाही. संघर्षात साथ देणारे तळागाळात गट बांधणारे त्यांना आता न्याय द्यायची वेळ आली आहे. पण, गद्दारांना आता माफी नाही, सुट्टी नाही. मग तो कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, उद्योगपती असो किंवा हमाल फरक पडत नाही. भेदभाव नाही. शोपीस गेले तर गेले, मतदार फळी दरवर्षी बदलत असते. हजारो पोरं १८ वर्षांचे होऊन मतदार बनतात. कोणी कोणावर अवलंबून नाही, जे राहतील त्यांचे मनापासून आभार आणि जातील त्यांना कायमचा रामराम!’ असा इशारा राजे गटातून बाहेर पडणार्यांना युवा नेते तथा फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटातून काहीजण बाहेर पडून विरोधकांच्या गोटात सामील झाले आहेत. या गट बदलणार्यांबद्दल बोलताना श्रीमंत विश्वजितराजे यांनी कडक शब्दात वरील मत मांडले आहे.