“यंदा माऊलींच्या सेवेत कोणतीही त्रुटी राहणार नाही”; फलटणमध्ये वारकऱ्यांसाठी नगरपरिषदेचे ३ दवाखाने २४ तास सज्ज ठेवणार; नगराध्यक्ष समशेरसिंह यांची विभागीय आयुक्तांच्या बैठकीत ग्वाही!


स्थैर्य, फलटण, दि. ४ जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी फलटण शहरासह तालुक्यातील तरडगाव व बरड येथील पालखी तळांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर फलटण येथील जलसंपदा विभागाच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सातारा जिल्ह्याच्या पालखी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त आणि विश्वस्तांचे स्वागत

आढावा बैठकीसाठी फलटणमध्ये आलेल्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी स्वागत केले.

यासोबतच आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त पुरुषोत्तम जाधव (पाटील) आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांचेही नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी स्वागत केले.

प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची मांदियाळी

या महत्त्वपूर्ण बैठकीला सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य लोंढे (कबीरबुवा) यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

तसेच नगरपरिषदेचे नियोजन व विकास सभापती संदीप चोरमले, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, आरोग्य सभापती सचिन अहिवळे, नगरसेवक रोहित नागटिळे आणि नगरसेविका सुपर्णा अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गतवर्षीच्या त्रुटी यंदा टाळणार: नगराध्यक्षांची स्पष्टोक्ती

गतवर्षी फलटण येथील पालखी तळावर बॅरिगेट्सच्या कारणावरून काही पेचाचे प्रसंग निर्माण झाले होते, याची आठवण पालखी सोहळा विश्वस्तांनी या बैठकीत करून दिली. यावर बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह म्हणाले, “गतवर्षी नगरपरिषदेवर प्रशासक राज होते. परंतु यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सेवा करण्याची संधी आमच्या लोकनियुक्त मंडळाला मिळाली आहे. त्यामुळे यंदा नियोजनात कोणतीही त्रुटी राहू देणार नाही.”

वारकऱ्यांसाठी ३ दवाखाने २४ तास सुरू राहणार

पालखी सोहळा फलटणमधून मार्गस्थ होत असताना वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी फलटण शहरात नगरपरिषदेचे ३ दवाखाने २४ तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुसज्ज आणि सुरू ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नगराध्यक्षांनी विभागीय आयुक्त व पालखी सोहळा प्रमुखांना दिली.

याबाबतचे कार्यालयीन आदेश तातडीने काढण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले आहेत. तसेच, स्वतः नगरपरिषदेच्या दवाखान्यांची पाहणी करून वारकऱ्यांसाठी आवश्यक ती सर्व औषधे व यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याच्या कडक सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. “श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असून, माऊलींच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत,” असे समशेरसिंह यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!