
थेट WhatsApp वर मिळवा
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने खाजगी इंधन कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ जाहीर केली असून नवे दर लागू झाले आहेत.
स्थैर्य,सातारा,दि. ०४ ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे इंधन दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख खाजगी इंधन कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. ही नवी दरवाढ लागू झाली असून देशभरातील ७ हजार १०८ पेक्षा जास्त इंधन पंपांवर ग्राहकांना वाढीव दराने इंधन खरेदी करावे लागत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.
सरकारी कंपन्यांचे दर स्थिर; खाजगी पंपांवर फटका
सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL, BPCL, HPCL) आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सरकारी आणि खाजगी इंधन पंपांवरील दरांमध्ये आता मोठी तफावत निर्माण झाली आहे. डिझेल महाग झाल्यामुळे मालवाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राचा खर्च वाढणार असून, आगामी दिवसांत महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडींचा इंधन बाजारावर परिणाम
भारत कच्च्या तेलाच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर आयतीवर अवलंबून असल्याने जागतिक बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरावर होतो. यापूर्वी जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यानंतर कंपनीने दर कपात केली होती. मात्र, आता पुन्हा जागतिक स्तरावर किमती वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





