दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा दिवसागणिक होत असतो आणि या निरंतर प्रक्रियेत परीवार, समाज, संगत, आंतरीक ऊर्जा, उमेद, संधी, इत्यादी बाबींचा प्रभाव निश्चितपणे जाणवतो, त्यामुळे स्पर्धेच्या या युगात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःला सर्वांगीण विकसित करणे कालसुसंगत असल्याचे आशादायी प्रतिपादन प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. जयंत करंदीकर यांनी केले.
उद्यानविद्या व कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःचे सामर्थ्याला ओळखत शेती आणि शेतकरी समाजाच्या सेवेसाठी तत्पर व्हावे, या उद्देशाने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे व्यक्तिमत्व विकास या विषयावर दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
हल्ली जो तो करीयर, स्पर्धा, पैसा, प्रसिद्धीच्या मृगजळाच्या मागे धावत असून आपली बौद्धिक, शारीरीक, आर्थिक क्षमता विचारात घेत योग्य दिशेने पाऊल टाकणारा यशाचा मानकरी ठरतो हे लक्षात घेत प्रत्येकाने आपली क्षमता, प्रामाणिक प्रयत्न आणि अभ्यासपूर्ण कृतीचा आधार घेत स्वयंसिद्ध व्हावे, असा कानमंत्र सुद्धा डॉ. जयंत करंदीकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी व्यक्तिमत्व विकासामुळे आळस, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागने शिकतो, आनंदी राहणे शिकतो आणि हे सर्व अधिक उत्साहाने आणि चैतन्याने करतो असे अनुमोदन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी व्यक्तिमत्व विकास ही एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, वैशिष्टयपूर्ण विचार आणि वर्तन पद्धती कशी विकसित होते याची प्रक्रिया आहे, ही एक डायनॅमिक प्रक्रिया आहे जी सतत बदलत असते आणि संदर्भ घटक आणि जीवन अनुभवांवर प्रभाव टाकते, असे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
या व्याख्यानासाठी मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज, फलटण येथील सौ. कांबळे मॅडम, सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक वृंद, दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही. भोसले व आभार प्रा. आशिष फडतरे यांनी केले.