पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आवाहन ; 31 जुलै अंतिम मुदत

स्थैर्य, सोलापूर, दि. 18 :  सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून आता सोलापूर जिल्हा रब्बी बरोबरच खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. खरिपामध्ये  विविध जोखमीमुळे  पीक विमा उतरवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. विमा योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी  खरीप 2019 मध्ये एकूण 2 लाख 80 हजार 375 शेतकऱ्यांना 123 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला होता. मंजूर रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पीक विमा योजनेबाबत अधिक माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले की, खरीप 2020 हंगामामध्ये विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व महा इ सेवा केंद्रांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान पीक विमा योजना खरीप 2020 साठी  18  जुलैपर्यंत 1 लाख 26 हजार 593 शेतकऱ्यांनी  सहभाग घेतला असून  विमा हप्त्यापोटी  4. 77 कोटी रुपये  शेतकऱ्यांनी भरले आहेत.

बिराजदार यांनी विमा योजनेबाबत दिलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे, कर्जदार शेतकऱ्यासाठी विमा योजना ऐच्छिक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बॅंकेला देणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांचा सहभाग बंधनकारक समजण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टी करारनामा / सहमतीपत्रक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र आणि बॅंकेच्या पासबुकाची प्रत सादर करुन इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांनी बॅंकेचा खाते क्रमांक, पिकाखालील क्षेत्र, भूमापन क्रमांक इ. खातरजमा करावी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!