
थेट WhatsApp वर मिळवा
भारतीय बार कौन्सिलने तीन आणि पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमांवरील कमाल वयोमर्यादेची अट रद्द केल्याने कोणत्याही वयात कायद्याचे शिक्षण घेता येणार आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २२ नोव्हेंबर : वकिलीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरदारांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भारतीय बार कौन्सिलने (BCI) एलएलबी अभ्यासक्रमांवरील कमाल वयोमर्यादेची अट रद्द केली आहे. तीन आणि पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमांची वयोमर्यादा मागे घेण्यात आल्याने आता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कायद्याचे शिक्षण घेऊन वकील होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
नोकरी करणाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठी संधी
अनेकांना नोकरी करताना, कौटुंबिक अडचणींमुळे किंवा सेवानिवृत्तीनंतर कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा असते, मात्र वयोमर्यादेच्या अटीमुळे त्यांना प्रवेश घेता येत नव्हता. बार कौन्सिलच्या सर्वसाधारण परिषदेने ५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील ठराव मंजूर केला असून, ६ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयालाही या निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे निवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना विधी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
तीन आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमांचे नियम बदलले
विद्यार्थ्यांना बारावीनंतर पाच वर्षांचा एकात्मिक एलएलबी अभ्यासक्रम आणि पदवीनंतर तीन वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम करता येतो. यापूर्वी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २० वर्षे आणि आरक्षित प्रवर्गासाठी २२ वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती, तसेच तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीही वयाची अट होती. आता या दोन्ही अभ्यासक्रमांवरील कमाल वयोमर्यादा पूर्णपणे हटवण्यात आल्याने शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या सर्वच उमेदवारांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.



