स्थैर्य, सातारा, दि. १५ : सातारा येथील जिल्हा रुग्णालयात करोना बाधित रुग्णांवर उपचार केलेले साहित्य रुग्णालयाबाहेर असणार्या एका शेडमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून उघड्यावरच रचून ठेवण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजता उघडकीस आली. या कचर्यावर एक श्वान वावर करत असल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, दुपारी 3 वाजले तरी या कचर्याची विल्हेवाट लावण्यात न आल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर यांच्या कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहेत.
मार्च 2020 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये करोना चे संक्रमण वाढायला लागल्यानंतर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात करोना अनुमानित आणि बाधित व्यक्तींसाठी दोन विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. एप्रिल महिन्यात जिल्ह्यामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (अपघात विभाग) हा रुग्णालयातच अन्य ठिकाणी हलवून त्या विभागात करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात आज 85 टक्के करोना अनुमानित आणि बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सुरक्षा रक्षक व पोलीस भीतीच्या छायेखाली वावरत असतानाच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्या साहित्याचे काय केले जाते याची माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात गेला असता रुग्णालयातील कर्मचार्यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार करोना अनुमानित आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी आणि नंतर त्याच्या घशाचा घेतलेला स्त्राव, शरीरातून काढण्यात आलेले रक्त, रुग्णांसाठी वापरलेल्या सलाईन, इंजेक्शन्स हे स्वतंत्र प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून हे साहित्य सोनगाव येथील कचरा डेपोमध्ये असणार्या बायोमेडिकल वेस्टमध्ये जाळून टाकले जातो. जिल्हा रुग्णालयातून वापरलेले साहित्य घेऊन जाण्यासाठी सातारा येथील एका संस्थेवर जबाबदारी देण्यात आली असून संबंधित संस्थेची गाडी दररोज सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात येऊन हा साहित्यवजा कचरा भरून सोनगाव डेपो येथे घेऊन जाते. मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये हे वापरलेले साहित्यवजा कचरा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये एकावर एक रचून ठेवला असल्याचे चित्र दिसून आले. त्यावर एका श्वानाचा वावर सुरू होता. तो श्वान पायाच्या पंजाच्या साह्याने प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये काय आहे, हे पाहण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सातारा जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर अनेक घटनांमुळे चर्चेत आले आहेत. रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी टाकलेला छापा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. मुळात करोना अनुमानित आणि बाधित व्यक्तींवर उपचार केलेल्या साहित्याची योग्यप्रकारे विल्हेवाट न लावल्यास त्याची बाधा अन्य व्यक्तींना होऊ शकते हे ढळढळीत सत्य असतानाही अमोद गडीकर मात्र अशा घटनांना फारसे महत्त्व न देता मनमानी कारभार करत असल्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया घेण्यासाठी अमोद गडीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते सोमवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात आले नसल्याचे सांगण्यात येत होते. सोमवारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झाल्यानंतर आपली देखील बदली दूर होईल या भीतीने ते बदली वाचवण्यासाठी पुणे येथे गेले असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे प्रमुख. ते आत्ता नक्की कोठे आहेत हे मात्र एकाही अधिकार्याला सांगता आले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सातारा शहरातील नागरिकांच्या आरोग्याप्रती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभाग निर्ढावला असलेला दिसून येत असताना करोना थोपवण्यासाठी पोलीस दल किती सजग आहे हे स्पष्ट झाले. जिहे, ता. सातारा येथे करोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागल्यामुळे त्या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाने विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिहे ग्रामस्थांना पोलिसांनी आवाहन केले असून आपण ड्रोन कॅमेर्याच्या निगराणी खाली आहात.आपण विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.आपण जर नियमांचे पालन केले नाही तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. ड्रोन कॅमेर्याद्वारे आपल्या गावचे चित्रीकरण अचानक कोणत्याही वेळी करण्यात येणार असल्याने जो कोणी गावात फिरताना आढळून येईल. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.