दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती कृषी विभागांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रच्या माध्यमातून रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता पंचायत समिती सभागृह, फलटण येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था सदस्य तथा कृषीमूल्य आयोग महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (भाप्रसे), सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी (भाप्रसे) हे या कार्यशाळेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि कृषी, वन, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले आहे.