
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । मुंबई । कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपळे गुरव यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि न्यू मिलेनियम इंग्रजी माध्यम शाळा, समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे येथे आयोजित महारोजगार मेळाव्यामध्ये पुण्यासह कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे ४० पेक्षा जास्त खाजगी उद्योजक सहभाग घेणार आहेत. त्यांच्याकडून सुमारे ७ हजार ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहे. या पदांकरीता किमान इयत्ता ८ वी ९ वी १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणारी विविध महामंडळे, दिव्यांग उमेदवारांकरीता विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉल देखील लावण्यात येणार आहे. उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतचीही माहिती उपलब्ध होणार आहे.
इच्छूक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणावीत. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उप आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.