विरोधकांनी खोट्या आरोपांची नौटंकी बंद करावी : प्रितसिंह खानविलकर


दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । फलटण । ‘‘ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टिका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे विरोधकांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे वारंवार त्यांच्यावर तोंडसुख घेवून चमकोगिरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न फलटणच्या एका माजी नगरसेवकांकडून होताना दिसत आहे. त्यांनी वेळीच स्वत:ला टाळ्यावर आणावे व आपली खोट्या आरोपांची ही नौटंकी बंद करावी’’, असा इशारा राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.

‘‘फलटणमध्ये अन्य दोन राजकीय व्यक्तींच्यात वैयक्तीक व्यवहारांवरुन एकमेकांविरोधात तक्रारींसह आरोप – प्रत्यारोपांच्या घडामोडी घडत असताना विरोधक विनाकारण यामागे ना.श्रीमंत रामराजे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. ना.श्रीमंत रामराजे यांच्यावर तोंडसुख घ्यायचे आणि प्रसिद्धी मिळवायची हा अशा तोंडाळ कार्यकर्त्यांचा धंदाच बनला आहे. ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात विकासाचे राजकारण केले आहे. त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळेच फलटण तालुका आज प्रगतीपथावर आहे. विरोधकांनी त्यांच्यावर टिका करताना त्यांच्या कामाचा, पदाचा मान राखावा. ‘उचलली जिभ आणि लावली टाळ्याला’ अशी वृत्ती आता बंद करावी. निवडणूका डोळ्यासमोर दिसू लागल्या की; आपले अस्तित्व लोकांना दाखवण्यासाठी असले नस्ते उद्योग करणे वेळीच थांबवावे. राजे गटाचे कार्यकर्ते असले थोतांड सहन करुन घेणार नाही आणि जनताही तुम्हाला भुलणार नाही, याचे भान तुम्ही ठेवावे’’, असेही प्रितसिंह खानविलकर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!