

रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट आणि सातारकरांच्या वतीने माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘सातारा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ. अच्युत गोडबोले व इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले.
स्थैर्य, सातारा, दि. १० : “जात, धर्म, पक्ष, पंथ या सर्वांना दूर ठेवून; तसेच स्त्री-पुरुष, डावे-उजवे असे कोणतेही मानदंड न लावता सर्वधर्मसमभाव राखत ज्याने समाजासाठी झोकून देऊन काम केले, अशाच व्यक्ती आणि संस्थांना हा ‘सातारा भूषण’ पुरस्कार दिला जातो,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत, समीक्षक व लेखक दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले.
सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ‘सातारा भूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट, सातारा व सातारकर नागरिकांतर्फे दरवर्षी ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या सुपुत्राला किंवा संस्थेला ‘सातारा भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.
यावर्षी हा मानाचा पुरस्कार माजी राज्यपाल श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम ४०,०००/- रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले आणि उदयन गोडबोले उपस्थित होते.
‘राजकारणात राहूनही सुसंस्कृततेचे अपवादात्मक उदाहरण’
प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले यांनी ट्रस्टच्या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, “स्वर्गीय भाऊकाका गोडबोले यांनी ५,००० रुपयांची पुंजी घालून सुरू केलेला हा ट्रस्ट आज गोडबोले परिवाराने एक कोटी रुपयांच्या निधीपर्यंत नेला आहे. स्व. अरुण गोडबोले यांनी ३५ वर्षांपूर्वी हा पुरस्कार सुरू केला. गेली ३६ वर्षे निवड समितीत काम करताना योग्य व्यक्तीचीच निवड केली जाते. आज श्रीनिवास पाटील हे पक्षविरहित आणि राजकारणात असूनही सुसंस्कृत कसे राहता येते, याचे अपवादात्मक उदाहरण आहेत. म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.”
पुरस्काराची रक्कम समाजकार्यासाठी देणार : श्रीनिवास पाटील
सत्काराला उत्तर देताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी गोडबोले कुटुंबीयांचे आभार मानले. ते म्हणाले, “गोडबोले कुटुंबीयांनी गोड बोलून दिलेले हे देणे आहे. स्व. अरुणरावांचा शब्द पुढील पिढीने पाळला. आज या पुरस्काराने खरोखरच माझी उंची वाढवली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, राजमाता सुमित्राराजे भोसले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या दिग्गजांना जेव्हा हा पुरस्कार मिळाला, तेव्हा मी उपस्थित होतो. आज त्यांच्या पंगतीत बसण्याचा मान मला मिळाला, हा क्षण मी खऱ्या अर्थाने जगतो आहे.” तसेच, या पुरस्कारातून मिळालेला निधी आपण आपल्या परिवारासोबत गरजू व्यक्ती आणि संस्थांसाठी वितरित करू, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
स्व. अरुण गोडबोले यांच्या आठवणींना उजाळा
प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी आपल्या भाषणात स्व. अरुण गोडबोले यांच्या आठवणींना उजाळा दिला. “अरुण हा अजातशत्रू मित्र होता. रस्त्यावरील कामगारापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांशी त्याने मैत्री जोडली. आज त्याच्या अपेक्षेप्रमाणेच हा पुरस्कार त्याचे मित्र श्रीनिवास पाटील यांना देताना विशेष आनंद होत आहे. गोडबोले परिवाराने ही वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा खंडित होऊ दिली नाही, याचे मोठे कौतुक वाटते,” असे ते म्हणाले.
या भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य रमणलाल शहा, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, डॉ. सुहास जोशी, विनोद झंवर, डॉ. चैतन्य गोडबोले, उदयन गोडबोले, आर्यन गोडबोले, दिलीप भट्टड, कन्हैयालाल राजपुरोहित, रमण वेलणकर, हरेश जोशी, डॉ. धनंजय देवी, प्रकाश गवळी, हेमंत बर्गे, श्रीराम नानल, दिलीप पाठक, सौ. गौरी तामणकर, गौतम भोसले, अविनाश लेवे, प्रकाश बडेकर, सारंग पाटील, श्रीकांत शेटे, अनिल काटदरे यांच्यासह श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य व सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
माजी राज्यपाल श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना ३६ वा ‘सातारा भूषण’ पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पुरुषोत्तम शेठ. यावेळी मंचावर त्यांच्या शेजारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, तसेच रा. ना. गोडबोले ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अच्युत गोडबोले आणि उदयन गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती आहे. छायाचित्रकार: अतुल देशपांडे (सातारा).