दैनिक स्थैर्य | दि. २९ मे २०२३ | फलटण |
जिंती (ता. फलटण) गावच्या हद्दीत असलेल्या श्री जितोबा देवस्थान मंदिराबाहेर पोलीस स्टेशनला आमच्याविरोधात तक्रार का दिलीस, या कारणावरून सुमारे ९ जणांनी एकास शिवीगाळ, दमदाटी व लोखंडी पाईप, दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या प्रकरणी मनोहर मोहन रणवरे, सोनल मनोहर रणवरे, लिलाबाई मोहन रणवरे, सागर मनोहर रणवरे, जीवन दिलीप रणवरे, दिलीप रतनसिंह रणवरे, सुनिता दिलीप ननवरे, वृषभ दिलीप रणवरे व मोहन कृष्णा रणवरे (सर्व रा. जिंती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास जिंतीतील जितोबा मंदिराबाहेर वरील आरोपींनी मिळून ‘तू आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार का दिली’, असे फिर्यादीस म्हणून लाकडी दांडक्याने, काठीने व लोखंडी पाईपने तसेच हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार पोलिसात दिलीप सदाशिव रणवरे (रा. जिंती) यांनी दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील आरोपींवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणे असे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सहा. पोलीस फौजदार हांगे करत आहेत.