बुधवार दि. 17 रोजी ना. देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये; निरा – देवधर व नाईकबोंबवाडी MIDC चे भूमिपूजन : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 जानेवारी 2024 | फलटण | माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला निरा देवधर प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते बुधवार दि. 17 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. त्यानंतर फलटण येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या पटांगणावर दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. तरी फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित रहावे; असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

कोळकी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की; आमचे नेते उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते फलटण तालुक्यामधील महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये नीरा देवधर प्रकल्प, नाईकबोंबवाडी येथील एमआयडीसी प्रकल्प यासोबतच विविध योजनांचे लोकार्पण हे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

काळज येथे निरा – देवधर प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर फलटण येथे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील सर्व आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत; असे यावेळी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!