दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२३ । मुंबई । दि. 26 ते 28 एप्रिल रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील घरावर विविध मागण्यांकरिता शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
यावेळी दि. 26 ते 28 एप्रिल दरम्यान महसूल मंत्र्यांच्या घरावर जाणाऱ्या अकोले ते लोणी पायी मोर्चाच्या प्रचारासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यात तालुका मेळावे होत आहेत. नुकतेच 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती दिनी आणि किसान सभेच्या वर्धापन दिनी आशागड, ता. डहाणू येथे तलासरी, डहाणू व पालघर तालुक्यातील 1500 स्त्री-पुरुषांचा उत्साही मेळावा झाला आणि मुरबाड या नवीन तालुक्यात सभा झाली. याप्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच दि. 12 एप्रिल रोजी किरवली, ता. वाडा येथे जव्हार, मोखाडा, विक्रमगड, शहापूर, वाडा, वसई व भिवंडी या 7 तालुक्यातील 1300 हून अधिक स्त्री-पुरुषांचा उत्साही मेळावा झाला. याप्रसंगी महात्मा फुले, कॉ. शामराव परुळेकर आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले.
वाडा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे वसई व भिवंडी तालुक्यात मंचाच्या पक्षफोड्या नेतृत्वासोबत गेलेले 50 हून अधिक प्रमुख कार्यकर्ते पुन्हा लाल बावट्याकडे परतले, आणि लाल स्कार्फ आणि गुलाबाचे फूल देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले गेले. उक्त मेळाव्यास डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, किसन गुजर, आमदार विनोद निकोले, किरण गहला, यशवंत बुधर, अमृत भावर, भरत वळंबा, चंद्रकांत घोरखाना, प्राची हातिवलेकर, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, सुनील सुर्वे, नंदू हाडळ यांनी मार्गदर्शन केले.