स्थैर्य, उंब्रज, दि.१९: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर
इंदोली (ता. कऱ्हाड) येथील इंदोली फाटा येथे काल शुक्रवारी सकाळी “ऑपरेशन
सेफ्टी ऑन हायवेज्’ या मोहिमेस सुरुवात झाली. या मोहिमेच्या पहिल्याच
दिवशी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या
वेळी समाधानकारक काम न दिसल्याने त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फैलाव घेत
“मला नुसता शो नको आहे, तर ऍक्शन हवी’ अशा सक्त सूचना त्यांनी
अधिकाऱ्यांना केल्या.
महामार्गावर इंदोली येथे, तसेच राज्यभरातील येणाऱ्या मार्गावर कालपासून
“ऑपरेशन सेफ्टी व हायवेज्’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर
होणारे अपघात रोखण्यासाठी मोहिमेमुळे महामार्गावर नियमबाह्य वाहन
चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत महामार्ग
पोलिस, जिल्हा वाहतूक शाखा, आरटीओ व स्थानिक पोलिसांनी एकत्रित येऊन
कारवाईला सुरुवात केली. विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, तसेच वाहतुकीचे नियम
मोडून बेदकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शंभूराज देसाई यांनी इंदोली फाट्यावर धाव
घेऊन प्रत्यक्षात पाहणी केली. मात्र, मोहिमेला अनुरूप काम होत नसल्याने
त्यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना फैलावर घेत “तुम्हाला नेमकी संकल्पना समजली
आहे का?’ अशी विचारणा केली. “कारवाईत हयगय नको’ अशी सूचना त्यांनी केली.
गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, “”वाहतुकीला शिस्त
लागावी, यासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईत बैठक घेतली होती.
त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
त्याची सुरुवात पुणे-बंगळूर हायवेवर केली आहे. महामार्गावरील लेन सोडून
अवजड वाहनांनी डाव्या बाजूने वाहने चालवली पाहिजेत हा नियम आहे; परंतु
वाहनचालक उजव्या बाजूने वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरतात. नियमभंग करून
चालणाऱ्या वाहनावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कोणालाही नाहक त्रास
देण्यासाठी ही मोहीम नाही, तर प्रवास करणाऱ्या लोकांचा जीव महत्त्वाचा
आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम असून, सकाळी आठ ते रात्री
आठ या 12 तासांत किती कारवाया झाल्या याचा अहवाल माझ्याकडे येईल.
वाहनधारकांनीही नियम मोडू नयेत.”