दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
पावसाने ओढ दिल्याने खरीप हातचे गेले, आतापर्यंत झालेला पाऊस रब्बीसाठी पुरेसा नाही, या पार्श्वभूमीवर टंचाई लक्षात घेऊन चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय झाला, पण चारा अनुदान देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही, गरज पडली तर शासन त्याबाबत सकारात्मक असेल, याची ग्वाही महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हसवड येथील कार्यक्रमानंतर येथे मुक्कामास असलेल्या ना. विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, धनंजय साळुंखे पाटील, जयकुमार शिंदे, अभिजीत नाईक निंबाळकर, सचिन कांबळे पाटील, अशोकराव जाधव, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगाम हातचा गेला असताना चारा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली, तथापि पाऊस सुरू झाल्याने पाणी टंचाई कमी झाली असली तरी लगेच चारा उपलब्ध होणार नसल्याने शासन गरज ओळखून चारा डेपो सुरू करणार असल्याचे मंत्रीमहोदयांनी निदर्शनास आणून दिले. त्यावेळी चारा डेपो सुरू झाले तरी चारा खरेदीसाठी पशूपालक शेतकर्यांकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पैसा नसल्याने त्याला चारा अनुदान द्यावे लागेल, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याबाबत निर्णय झाला नाही. मात्र, सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शासनाने चारा पिकांसाठी बियाणे उपलब्ध करून दिले आहे, ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी चारा पिके घ्यावीत, असे आवाहन मंत्री विखे-पाटील यांनी केले.
कंत्राटी नोकर भरतीमुळे स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासनात दाखल होणार्या तरुणांवर अन्याय होणार नाही ना, असा प्रश्न विचारताच सदर भरती तात्पुरती आणि केवळ अनुभवी निवृत्तांना तात्कालिक कामासाठी सामावून घेणारी आहे, काम संपताच त्यांचे कंत्राट संपेल, असे सांगत त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, याची ग्वाही विखे-पाटील यांनी दिली. सदर निर्णय पूर्वीच्या सरकारचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरालगतच्या गावात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असताना त्यांना पुरेसे गावठाण नसल्याने नव्याने वस्तीस आलेल्या लोकांना दुप्पट कर भरावा लागत असल्याने सदर गावात हद्दवाढीद्वारे गावठाण वाढ करण्याबाबत सदर ग्रामपंचायत यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव दिल्यास त्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे सूतोवाच महसूलमंत्री ना. विखे पाटील यांनी केले.
खरीप वाया गेले, रब्बीच्या पेरण्या होतील इतपत पाऊस झाला असला तरी या पावसाने अद्याप नदी, नाले, ओढ्यांना पाणी वाहिले नसल्याने विहिरीत पाणी वाढले नाही. परिणामी रब्बीचा पेरा अडचणीत येण्याची शक्यता निदर्शनास आणून देताच वाट पाहू, पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. नाही झाला तर शासन सर्वतोपरी मदत करेल, याची ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली.