फलटणमध्ये प्रवाशांअभावी एकही बस धावली नाही; आज पासून काही प्रमुख मार्गावर बसेस सोडण्याचा निर्णय


स्थैर्य, फलटण, दि. २३ : करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये फलटण शहर व तालुक्यात आज काही शिथीलता निर्माण करण्यात आली असून त्या दरम्यान राज्यभर एस. टी. प्रवासी वाहतुकीला जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली, मात्र फलटण मध्ये काल एकही बस प्रवाशांअभावी धावली नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस. टी.) आजपासून सोशल डिस्टनसींग सांभाळून क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी घेऊन बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद न लाभल्याने आज राज्यभर बसेस धावल्या नसल्याचे समजते. उद्या पासून काही प्रमुख मार्गावर बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फलटण आगारातून उद्या दुपारी १ वाजता फलटण-सातारा मार्गावर एक बस सोडण्यात येणार असून ती दुपारी सातारा-फलटण मार्गावर परत येऊन सायंकाळी फलटण-सातारा अशी जाऊन सातारा येथे मुक्काम करेल, रविवारी सकाळी ६ वाजता सातारा-फलटण आणि सकाळी ८ वाजता फलटण-सातारा अशी धावणार आहे, उद्या प्रवाशी असोत अथवा नाही सदर बस फलटण-सातारा मार्गावर धावणार आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एस. टी.प्रशासनाने केले आहे. त्यानंतर प्रवाशांच्या मागणीनुसार जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!