
दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | फलटण |
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त निरगुडी ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन निरगुडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कोमल सचिन सस्ते यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक श्री. धनाजी लकडे यांनी केले व त्यानंतर दीपक सस्ते (पाटकरी अण्णा), ग्रामसेवक कदम अण्णा, प्रशांत सोनवणे, सरपंच कोमल सस्ते व निरगुडी गावचे युवा नेते श्री. सचिन सस्ते यांनी मनोगत व्यक्त करताना अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी मनोगतात सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ‘चौंडी’ या छोट्याशा गावी धनगर समाजातील माणकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव होळकर यांच्याशी झाला. त्यानंतर अहिल्यादेवी यांच्या लग्नानंतर कुंभेरीच्या लढाईत खंडोजीराव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्यादेवी यांच्याकडे स्वराज्याची सूत्रे हाती आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक कुशल प्रशासक, संघटक होत्या. त्यांनी सर्वधर्मसमभावाचा आदर्श राखत मंदिरे, मशिदी, दर्गे व विहार बांधली, तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली.
राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणार्या यशवंत फणसे या बहाद्दरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवताधर्म. प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनांचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खर्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन!
निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ. सुलभा तानाजी सस्ते, सौ.जोश्ना संदीप सस्ते, सौ. सारिका धनाजी लकडे, सौ. चैत्राली नंदकुमार सस्ते यांना प्रदान करण्यात आला. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका जयश्री गणपतराव सस्ते यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावातील अंगणवाडी सेविका सोनवणे मॅडम व पोस्टमन श्री. किरण देशपांडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ करण्यात आला.
निरगुडी गावच्या सरपंच सौ. कोमल सचिन सस्ते व विद्यमान संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण सौ. जयश्री गणपत सस्ते यांचा सत्कार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर तरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नेते, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री शिवाजी सस्ते, श्री. अवचित सस्ते, श्री. दीपक सस्ते, श्री. गणपत सस्ते, श्री. चंद्रकांत सस्ते, श्री. दीपक मुरलीधर सस्ते, श्री. राजेंद्र लकडे, श्री. धनाजी लकडे, श्री. प्रशांत सोनवणे, श्री. महावीर बनसोडे, श्री. प्रकाश जाडकर, श्री. किरण देशपांडे, सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका व निरगुडी ग्रामपंचायत सरपंच कोमल सस्ते, उपसरपंच सारिका बनसोडे, सदस्य शाहूराव सस्ते वामन जाधव, दीपक मदने, ग्रामसेवक श्री. नारायण कदम, क्लार्क तुकाराम आवटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					 
					