निरा – देवघर प्रकल्पासाठी केंद्राने 1 हजार कोटींचा निधी द्यावा; खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी


स्थैर्य, फलटण दि.11 : फलटण – खंडाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निरा – देवघर प्रकल्पाची कामे प्रकल्पातील पाणी बारामतीकडे नेण्यासाठी मुद्दाम रखडवली गेली आहेत. या योजनेच्या पूर्ततेसाठी किमान 1 हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून केंद्र सरकारने या निधीची उपलब्धता करुन दुष्काळी भागाचा ‘दुष्काळी’ हा शब्द कायमस्वरुपी पुसून टाकावा, अशी मागणी खासदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध प्रश्‍नांबाबत नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी वरील विनंती त्यांनी केली.

सदर योजनेबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा देवघर या प्रकल्पाला 1984 साली या मंजुरी झाली व 2000 साली या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र कालव्याची कामे प्रलंबित ठेवण्यात आली. जर ही कामे पुर्ण झाली असती तर प्रकल्पातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध झाले असते. माढा मतदारसंघातील तसेच सातारा मतदारसंघातील खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोल्यातील काही भाग अशा 100 किलोमीटर अंतराच्या लोकांना पाणी पोहोचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. परंतु 21 वर्षांमध्ये या योजनेस फक्त 108 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला व ही योजना जाणून बुजून रखडवणयात आली. या योजनेचे 21 वर्षांमध्ये फक्त 65 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी यापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे परंतु हा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्‍न त्यांनी जाणीवपूर्वक सोडवला नाही. याउलट त्यांनी हे पाणी प्रकल्पाचे लाभार्थी नसतानाही बारामती मतदारसंघाकडे वळवले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात चुकीच्या धोरणानुसार बारामतीकडे जाणारे पाणी थांबवून हे पाणी पुन्हा या दुष्काळी पट्ट्यातील लोकांना देण्यात आले. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांनी हे पाणी म्हणजे अमृतच आहे असं समजून यांचे स्वागत केले. परंतु राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि शरद पवार यांनी पुन्हा हे पाणी बारामतीकडे नेले. या नीरा-देवघर प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तो आपण पूर्ण करण्यासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून द्यावा. पर्यायी बंदिस्त पाईपलाईनद्वारे सुद्धा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माळशिरस, फलटण, सांगोला, पंढरपूर या भागातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटेल. या दुष्काळी भागाचा दुष्काळी हा शब्द कायमस्वरूपी निघून जाईल. यामुळे या मतदार संघातील जनता सदैव आपले ऋणी राहील, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी पंतप्रधानांना आवर्जून सांगितले.


Back to top button
Don`t copy text!