नाईट शिफ्ट करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; रात्रीच्या कामामुळे हृदयाच्या रचनेवर होतोय थेट परिणाम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दीर्घकाळ नियमितपणे नाईट शिफ्ट करणाऱ्यांच्या हृदयाच्या स्नायूंच्या भिंती जाड होणे आणि रक्तातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होणे असे गंभीर बदल नव्या अभ्यासात समोर आले आहेत.

स्थैर्य,सातारा, दि. २३ नोव्हेंबर : आयटी कंपन्या, कॉल सेंटर, रुग्णालये आणि कारखान्यांमध्ये लाखो कर्मचारी नियमितपणे नाईट शिफ्टमध्ये काम करतात. सुरुवातीला रात्रीचे जागरण सामान्य वाटत असले, तरी दीर्घकाळ रात्री काम केल्याने हृदयाच्या रचनेवर आणि कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ‘युरोपियन हार्ट जर्नल – कार्डिओव्हॅस्क्युलर इमेजिंग’मध्ये १९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात ४२ हजार ६७१ नागरिकांच्या आरोग्य माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

हार्ट एमआरआय आणि रक्त तपासणीतून समोर आलेले निष्कर्ष

संशोधकांनी हार्ट एमआरआय आणि रक्ताच्या नमुन्यांच्या आधारे नाईट शिफ्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हृदयाची सखोल तपासणी केली. यामध्ये नियमित रात्री काम करणाऱ्यांच्या हृदयाच्या मुख्य पंपिंग चेंबरच्या भिंती इतरांच्या तुलनेत जाड झाल्याचे व चेंबरचा आकार किंचित लहान झाल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या रक्तात हृदयासाठी उपयुक्त असलेल्या ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी आढळले, तर ट्रायग्लिसराइड्स आणि शरीरातील सूज वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.

शरीराचे नैसर्गिक घड्याळ बिघडल्याने वाढतो धोका

मानवी शरीरात झोपेचे आणि जागण्याचे नियमन करणारे नैसर्गिक जैविक घड्याळ असते. सतत रात्री जागल्याने आणि दिवसा झोपल्याने या घड्याळाचा समतोल बिघडतो. त्याचा थेट परिणाम चयापचय क्रिया, रक्तदाब आणि हार्मोन्सवर होऊन भविष्यात हृदयविकाराचा धोका बळावतो. त्यामुळे नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी ड्युटीनंतर शांत वातावरणात पुरेशी झोप घ्यावी, आहारात फळे, पालेभाज्या व ओमेगा-३ युक्त पदार्थांचा समावेश करावा आणि नियमित रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!