
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यात जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यात १० ते २४ जानेवारीदरम्यान ऑनलाइन स्वयंगणना, तर २५ जानेवारीपासून घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना केली जाणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : राज्यात आगामी जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २५ जानेवारीपासून घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यापूर्वी १० ते २४ जानेवारीदरम्यान नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्वयंगणना नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.
डिजिटल प्रणाली आणि अचूक नोंदींवर विशेष भर
या जनगणना प्रक्रियेत ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली, प्रगणकांसाठी विशेष मोबाइल ॲप, ऑनलाइन स्वयंगणना आणि रिअल-टाइम देखरेख प्रणालीचा वापर केला जाणार आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी सांगितले की, जनगणनेतील आकडेवारीचा थेट संबंध मतदारसंघ पुनर्रचना आणि वैधानिक आरक्षणाशी असतो. त्यामुळे राज्यभरातील सुमारे २.८४ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांनी बेघर व्यक्ती, वसतिगृहे, कारागृहे, हॉटेल्स आणि दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकाची अचूक नोंद घ्यावी.
शहरी भागातील आव्हाने आणि पूर्वतयारीचे नियोजन
राज्याची सुमारे ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याने स्थलांतर, दाट वस्ती आणि बंद घरांचे नियोजन काळजीपूर्वक करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य सचिव के. एच. गोविंदराज यांनी दिल्या. तसेच प्रधान सचिव व राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या व प्रशिक्षण वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.



