खाजगी रुग्णालयांच्या मनमानीवर अंकुश; हिवाळी अधिवेशनात येतोय ‘हा’ कठोर कायदा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

आपत्कालीन परिस्थितीत पैशांअभावी उपचार नाकारणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करणारा आणि रुग्णांना कायदेशीर हक्क देणारा वैद्यकीय चिकित्सा आस्थापना कायदा हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : राज्यातील खाजगी रुग्णालयांची आर्थिक पिळवणूक आणि मनमानी रोखण्यासाठी राज्य सरकार विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना कायदा’ संमत करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणाऱ्या कोणत्याही रुग्णाला पैशांची मागणी न करता सुवर्ण तासात तातडीने प्राथमिक उपचार देणे रुग्णालयांना बंधनकारक राहणार आहे. तसेच नोंदणीशिवाय कोणताही दवाखाना किंवा रुग्णालय सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पारदर्शकता आणि रुग्णांच्या हक्कांसाठी महत्त्वाच्या तरतुदी

या कायद्याच्या कक्षेत ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि निसर्गोपचार पद्धतीमधील सर्व खाजगी, धर्मादाय व स्वायत्त रुग्णालये, नर्सिंग होम आणि पॅथॉलॉजी लॅबचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णालयाला दर्शनी भागात आणि संकेतस्थळावर उपचारांचे व चाचण्यांचे दरपत्रक मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करणे अनिवार्य असेल. ठरवलेल्या दरापेक्षा जादा शुल्क आकारणाऱ्या किंवा सविस्तर बिल न देणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय रुग्णांना आजाराचे निदान, अंदाजे खर्च, केस पेपर आणि दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मत घेण्याचे कायदेशीर अधिकार मिळणार आहेत.

संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल अधिवेशनात सादर होणार

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडल्यानंतर काही तरतुदींवरील मतभेदांमुळे ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले होते. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने राज्यभरातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांच्या सूचना व हरकती जाणून घेतल्या आहेत. या सुधारणांसह समितीचा अहवाल व अंतिम विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडून संमत केले जाईल, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!